भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरणाला मोठा दिलासा; महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांमध्ये सुधारणा; नागरिकांच्या मालकी हक्काच्या प्रक्रियेला मिळणार गती-आमदार राणाजगजितसिंह पाटील 

धाराशिव, दि. १५ : 

भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध बनविण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली "महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करणे) (दुसरी सुधारणा) नियम, २०२६" मध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
महसूल विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, या सुधारणांमुळे जमीन रूपांतरण प्रक्रियेला अधिक कायदेशीर बळकटी मिळणार आहे. यामुळे रूपांतरणाची कार्यवाही अधिक वेगवान, पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन नियमांनुसार सहकारी गृहनिर्माण संस्था, मिश्र वापराचे भूखंड, स्वयं-पुनर्विकास प्रकल्प तसेच भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या मालकी हक्काशी संबंधित अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच नजराणा निश्चिती, शासनाची पूर्वपरवानगी आणि अर्ज निकाली काढण्यासाठीची कालबद्ध कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आल्याने प्रशासकीय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.
या सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि विविध प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार असून, जमिनींच्या मालकी हक्काची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रलंबित जमीन रूपांतरण प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक मानला जात आहे.

 
Top