५३ वर्षांची अखंड परंपरा; नळदुर्गात २३ ते ९ जुलै दरम्यान भव्य भागवत सप्ताह
नळदुर्ग, दि. १५ जुलै :
नळदुर्ग शहरातील आदर्श शिक्षक श्री. वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी गेल्या तब्बल 53 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्रीमद्भागवत सप्ताहाची परंपरा यंदाही भक्तिभावाने साजरी होणार आहे. 23 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या या सप्ताहामुळे संपूर्ण नळदुर्ग शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
भागवत सप्ताहास 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजता धार्मिक विधी, पूजन व मंगलमय वातावरणात प्रारंभ होईल. सात दिवस विविध धार्मिक विधी, भागवत पारायण, भजन-कीर्तन आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांना भागवत धर्माचे महत्त्व आणि जीवनमूल्यांचा संदेश दिला जाणार आहे.
सप्ताहादरम्यान 27 जुलै रोजी गोवर्धन काला, तर 28 जुलै रोजी सुदामाच्या पोह्यांची हृदयस्पर्शी कथा सांगितली जाणार आहे. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सप्ताहाची सांगता होणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भागवत सप्ताहात केज येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. श्रीराम जोशी बुवा महाराज आपल्या अमृतवाणीतून श्रीमद्भागवत कथामृताचे रसाळ निरूपण करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या 20 वर्षांपासून श्रीराम जोशी बुवा या सप्ताहात कथा सांगत असून त्यांच्या प्रभावी व ओघवत्या निरूपणातून भागवताचे गूढ तत्त्वज्ञान आणि जीवनोपयोगी संदेश भाविकांपर्यंत पोहोचत आहेत.
अहंकारी परिवाराने जपलेली ही 53 वर्षांची अखंड धार्मिक परंपरा आज नळदुर्गच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. सप्ताहादरम्यान दररोज शेकडो महिला, पुरुष आणि युवक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून भागवत कथाश्रवणाचा लाभ घेतात. त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
या भागवत सप्ताहाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री. वसंतराव अहंकारी, श्री. बाबुराव अहंकारी, श्री. बळवंत अहंकारी, श्री. अनंत अहंकारी, श्री. सुनील पाटील, श्री. विकास अहंकारी, श्री. वैभव अहंकारी, श्री. योगेश अहंकारी तसेच सौ. जयश्री अहंकारी, सौ. वनमाला अहंकारी, सौ. माधुरी अहंकारी, सौ. संध्या अहंकारी, सौ. राणी पाटील, सौ. अश्विनी अहंकारी, सौ. वर्षा अहंकारी, सौ. आदिती अहंकारी आणि संपूर्ण अहंकारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
..