SIR अभियानाला नळदुर्ग नगरपालिकेत वेग; बीएलओंना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

नळदुर्ग, दि. १५ जुलै :

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नळदुर्ग नगरपालिकेच्या सभागृहात बीएलओ (BLO) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली. अभियानातील सर्व कामे निर्धारित मुदतीत आणि अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

नगराध्यक्ष बसवराज धरणे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व उपनगराध्यक्ष नय्यर जगीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत SIR अभियानाचा आढावा घेण्यात आला. घरभेटी, ऑनलाइन नोंदणी, मॅपिंग तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करून कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. तसेच ऑनलाइन प्रक्रिया आणि मॅपिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीला कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे, सर्व बीएलओ तसेच सहाय्यक कर्मचारी असे एकूण ३४ जण उपस्थित होते. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि पुढील कार्यपद्धतीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
Top