बंद खोलीत सुरू होता तिरट मटका; नळदुर्ग पोलिसांचा मध्यरात्री छापा, ९ जणांवर गुन्हा,
जुगार साहित्य व रोकडसह तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
नळदुर्ग, दि. १५ :
नळदुर्ग पोलीसांनी जुगारविरोधी मोहिमेत प्रभावी कारवाई करत सलगरा (दि.) शिवारातील इदगाहच्या पाठीमागील बंद खोलीवर मध्यरात्री छापा टाकून तिरट मटका जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.
या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह एकूण १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलगरा (दि.) ता.तुळजापूर शिवारात, इदगाहच्या पाठीमागील बंद खोलीत सुरू असलेल्या तिरट मटका जुगारावर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान चंद्रकांत विठ्ठल लोमटे (वय ४२, रा. हिप्परगा रवा, ता. लोहारा, जि. धाराशिव) याच्यासह अन्य आठ जण जुगार खेळताना आढळून आले.
या ठिकाणाहून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ९३, हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नळदुर्ग परिसरात अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलीसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे