ब्राह्मी लिपीचे भारतीय भाषांमध्ये रूपांतर करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणाच्या डिझाईनला पेटंट; अणदूरचे सुपुत्र डॉ. सचिन कंदले यांच्या संशोधनाला राष्ट्रीय गौरव; इतिहास संशोधनाला नवी दिशा

अणदूर, दि. १५ जुलै : 

भारतीय भाषांचे जतन, संवर्धन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संवर्धन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे सुपुत्र तथा बीड येथील स्वा. सावरकर महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. सचिन चंद्रशेखर कंदले यांनी आपल्या सहकारी संशोधकांसह उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 

संशोधन पथकाने ब्राह्मी लिपीचे आधुनिक भारतीय भाषांमध्ये रूपांतर करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणाचे डिझाईन विकसित केले असून, या नावीन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
या संशोधन पथकात उच्च शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे, डॉ. आनंद रत्नपारखे (बीड), प्रा. डॉ. अरुण चव्हाण (परळी) आणि विशाल सासवडे (छत्रपती संभाजीनगर) यांचा सहभाग होता.

हे अत्याधुनिक उपकरण ब्राह्मी लिपीतील मजकूर अचूकपणे ओळखून त्याचे विविध भारतीय भाषांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहे. त्यामुळे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन, भाषांतर व अभ्यास अधिक सुलभ होणार असून इतिहास संशोधक, पुरातत्त्व विभाग, विद्यार्थी आणि विविध संशोधन संस्थांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या संशोधनामुळे भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी जोड मिळाली असून, सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी हे संशोधन भविष्यात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

अणदूरचे सुपुत्र डॉ. सचिन कंदले यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संशोधन क्षेत्रातील या अभूतपूर्व कामगिरीबद्दल डॉ. कंदले व त्यांच्या सर्व सहकारी संशोधकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top