BLO नियुक्तीबाबत शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश; शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम होऊ देऊ नका
मुंबई, दि. ८ जुलै :
राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात येत असली, तरी त्यांच्या नियमित अध्यापन कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिले आहेत.
या संदर्भात शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी व संबंधित यंत्रणांना आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र, या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी शाळांनी योग्य नियोजन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशानुसार, BLO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज सलगपणे पूर्ण होईल, अशा पद्धतीने त्यांचे वेळापत्रक तयार करावे. ३० जुलै २०२६ पर्यंत शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करून उर्वरित वेळेत BLO ची जबाबदारी पार पाडण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, ज्या शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती झालेली नाही, त्यांच्यावर अतिरिक्त प्रशासकीय कामांचा बोजा टाकू नये. संबंधित शिक्षकांना शैक्षणिक व इतर आवश्यक कामात सहकार्य करावे आणि शाळा प्रमुखांनी अंतर्गत नियोजनाद्वारे अध्यापन सुरळीत ठेवावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण संचालकांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विहित नमुन्यात शासनाकडे सादर करण्यास सांगितले आहे.
या आदेशामुळे शिक्षकांवर BLO ची जबाबदारी असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.