कै. वसंतराव नाईक यांची ११३ वी जयंती व जागतिक कृषी दिनानिमित्त नळदुर्ग महाविद्यालयात ५० केशर आंब्यांची लागवड
नळदुर्ग, दि. १ जुलै :
नळदुर्ग येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची ११३ वी जयंती आणि जागतिक कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कै. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात एकूण ११३ केशर आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आज शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते ५० केशर जातीच्या आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमातून त्यांच्या हरित विकासाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.