जळकोटला मिळाला प्रवाशांचा हक्काचा आसरा; सोनटक्के परिवाराचा स्वखर्चातून आदर्श उपक्रम
नळदुर्ग, दि. ५ जुलै :
सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी जळकोट ता. तुळजापूर येथे स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा बसथांब्याचे लोकार्पण शनिवारी उत्साहात पार पडले. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते गणेश सोनटक्के आणि पंचायत समिती सदस्य ॲड. आशिष सोनटक्के यांनी युवक नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा लोकोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.
मुंबई–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या जळकोट गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार असून, येथील बसस्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, अनेक वर्षांपासून प्रवाशांना बसण्याची किंवा पावसापासून संरक्षण मिळण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
ही गरज ओळखून सोनटक्के परिवाराने बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना सुसज्ज प्रवासी निवारे उभारले आहेत. या निवाऱ्यांमध्ये बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे आता प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रतीक्षेची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या प्रवासी निवाऱ्यांचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख आणि उपसभापती सौ. रोहिणी मेलगिरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांना शुभेच्छा देत सोनटक्के परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. "प्रवाशांच्या मूलभूत गरजेला प्राधान्य देत उभारण्यात आलेला हा प्रवासी निवारा इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल," असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या या प्रवासी निवाऱ्यामुळे जळकोट व परिसरातील
प्रवाशांची वर्षानुवर्षे भेडसावणारी गैरसोय दूर झाली असून, सामाजिक उत्तरदायित्वाचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.