माळरानावर फुलले ‘लाल सोने’; अणदूरच्या युवा शेतकऱ्याने उभारली ४ एकर सेंद्रिय डाळिंब बाग; जिद्द, कष्ट , आधुनिक शेतीचा आदर्श; सिद्धाराम धमुरे यांची यशोगाथा ठरतेय प्रेरणादायी

अणदूर, दि.५जुलै : श्रीकांत अणदुरकर

"शेती तोट्याचीच असते" हा समज खोटा ठरवत अणदूर येथील युवा प्रयोगशील शेतकरी सिद्धाराम (अप्पू) धमुरे यांनी डोंगरपायथ्याच्या चार एकर माळरानावर सेंद्रिय डाळिंबाची दर्जेदार बाग फुलवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या १५ महिन्यांत बहरलेली ही बाग आता लालभडक, रसाळ डाळिंबांनी लगडली असून, येत्या पंधरवड्यात विक्रीसाठी सज्ज होणार आहे.

मराठवाड्यात डाळिंबाचे पीक चांगले येत नाही, हा समज आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी मोडून काढला आहे. प्रत्येक झाडावर २० ते २५ दर्जेदार फळे लागली असून, पहिल्याच हंगामात २० ते २५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. बाजारभावानुसार यामधून किमान २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास धमुरे यांनी व्यक्त केला.

सिद्धाराम धमुरे हे सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवे प्रयोग करणारे शेतकरी म्हणून ओळखले जातात. सिमला मिरची, द्राक्षे, पपई, ऊस यांसारख्या पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी डाळिंबाची सेंद्रिय बाग उभारून पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन हेच त्यांचे शेतीचे सूत्र आहे.

शेतीकडे केवळ परंपरा म्हणून नव्हे तर उद्योग म्हणून पाहिल्यास ती निश्चितच फायदेशीर ठरते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकर फळबाग उभारावी, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि आत्मविश्वासाने शेती करावी, असा संदेश ते देतात.

धमुरे यांच्या शेतातील विविध प्रयोग पाहण्यासाठी परिसरासह दूरदूरच्या भागातून शेतकरी भेट देतात. ते प्रत्येकाला विनामूल्य मार्गदर्शन करून आधुनिक शेतीचे तंत्र समजावून सांगतात. त्यांच्या जिद्दीने उभारलेली डाळिंब बाग ही आज परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

 वडिलांकडून मिळाला शेतीचा संस्कार
सिद्धाराम धमुरे यांना शेतीचा वारसा वडील कै. चंद्रकांत आण्णा धमुरे यांच्याकडून लाभला. उत्तम शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शेतीबरोबरच पाटील तांड्यातील गरजू कुटुंबांना विविध प्रकारची मदत केली. हाच सेवाभाव आणि शेतीचा वारसा पुढे नेत सिद्धाराम धमुरे यांनी आधुनिक शेतीचा आदर्श उभा केला आहे. वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या "'चंद्रकांत आण्णा धमुरे" प्रतिष्ठान'च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत. या कार्यात भाऊ करबसप्पा धमुरे आणि पुत्र शुभम धमुरे यांचीही मोलाची साथ लाभत आहे.


शेतीचे ऑडिट करा; नफ्याची शेती करा
शेतीत नफा मिळवायचा असेल तर खर्च-उत्पन्नाचा अचूक हिशोब ठेवणे आवश्यक आहे, असे सिद्धाराम धमुरे सांगतात. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि शेतीचे नियमित ऑडिट केल्यास तोटा टाळता येतो. पुढील वर्षी सेंद्रिय डाळिंब निर्यात करण्याचा त्यांचा मानस असून फळबाग लागवडीसाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

५० एकर शेतीत आधुनिकतेची यशस्वी वाटचाल

५० एकर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिद्धाराम धमुरे यांनी यशस्वी शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. ३५ एकर ऊसातून विक्रमी उत्पादन घेत ते दरवर्षी सुमारे दोन हजार टन ऊस कारखान्यास देतात. भविष्यात चंदन, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो व वॉटर ॲपलची लागवड करण्याचा त्यांचा मानस असून, प्रत्येक शेतकऱ्याने किमान २० गुंठे फळबाग करावी, असा त्यांचा सल्ला आहे.


 
Top