शासन परवानगीशिवाय सुरू असलेल्या शाळेवर कारवाईचे आदेश
तीन दिवसांत शाळा बंद करण्याचे निर्देश; अन्यथा दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा
नळदुर्ग, दि. ४ जुलै :
जिल्हा परिषद धाराशिवच्या शिक्षण विभागाने शासनाची परवानगी न घेता सुरू असलेल्या एका अनधिकृत शाळेविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी काढलेल्या आदेशानुसार संबंधित शाळा तीन दिवसांच्या आत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे पालन न झाल्यास नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 'पोदार इंटरनॅशनल स्कूल' ही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे कृत्य मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ तसेच महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यीत शाळा नियम, २०१२ यांच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळा व्यवस्थापनास तात्काळ शाळा बंद करून त्याबाबतचा अहवाल तीन दिवसांत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास नियमानुसार एक लाख रुपयांपर्यंत दंड, तसेच उल्लंघन सुरू राहिल्यास प्रति दिवस दहा हजार रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्याची तरतूद असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, शाळा विहित मुदतीत बंद न केल्यास संबंधित मुख्याध्यापक व संस्था चालकांविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्यातील विनापरवानगी सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता शाळेच्या मान्यतेसाठी सन २०२५ मध्ये रितसर प्रस्ताव संबंधिताकडे दाखल केले आहे.या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही सुरु असुन शिक्षण मंत्री यांच्या सचिवांकडे अंतीम मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२६ मध्येही पत्रव्यवहार केला आहे.