जनता महाविद्यालयात ७०० विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ; अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती
धाराशिव, दि. ४ जुलै :
छत्रपती संभाजीनगर कृती विभागांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील जनता महाविद्यालयात शनिवारी अंमली पदार्थविरोधी जनजागृती व नशामुक्ती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सुमारे 700 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, 4 प्राध्यापक आणि 20 शिक्षक सहभागी झाले.
युवा पिढीमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गांजा, अफू, ड्रग्ज तसेच विविध प्रकारच्या अमली पदार्थ व नशेच्या गोळ्यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
हा जनजागृती कार्यक्रम साईनाथ ठोंबरे (उपविभागीय पोलीस अधिकारी), पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला टेळे, सुरेश राऊत आणि नागेश केंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.