नंदगावकरांचे भाग्य उजळले; गावठाण फिडर सुरू, २४ तास वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा
नळदुर्ग, दि. ९ जुलै:
चार थेंब पाऊस पडला तरी तासन्तास वीज खंडित होण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या नंदगाव ता.तुळजापूर येथिल ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील, सभापती सिध्देश्वर कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे नंदगावसाठी स्वतंत्र गावठाण फिडर मंजूर झाला असून त्याचे लोकार्पण बोरगाव उपकेंद्रात करण्यात आले. फिडर सुरू झाल्याने गावातील वीजपुरवठा अधिक स्थिर व अखंड राहणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
नंदगावमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वीची जुनी वीजवाहिनी असल्याने पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होत होती. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही समस्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्हा परिषद सभापती सिद्धेश्वर अण्णा कोरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आमदार पाटील यांनी तत्काळ संबंधित विभागाला पत्र देऊन नंदगावसाठी गावठाण फिडर मंजूर करून घेतला.
या फिडरचे लोकार्पण बोरगाव उपकेंद्रात पार पडले. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता डी. एम. तगारे, कर्मचारी सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सात्विक शहा, प्रशांत बाबा करंडे, नंदगावचे सरपंच विश्वजीत घंटे, दिलीप बिराजदार, शरद येरगुरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काटे, मल्लिनाथ गुडडे, परमेश्वर चिनगुंडे, प्रदीप वाघमारे, इराण्णा वाले, सचिन कोरे, सागर चौगुले, अप्पू करंडे, सुरज गुडडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावठाण फिडर कार्यान्वित झाल्याने वारंवार होणाऱ्या वीज खंडितीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नंदगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील, सभापती सिध्देश्वर कोरे यांचे विशेष आभार मानण्यात आले.