पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा स्फोट?; नगरपरिषदेसमोर युवा विकास सेनेचा आक्रोश
अमृत-२ पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; युवा विकास सेनेचे नगरपरिषदेसमोर आंदोलन, चौकशीची मागणी
नळदुर्ग, दि. ८ जुलै :
नळदुर्ग शहरातील अमृत-२ पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, करारभंग, निकृष्ट दर्जाचे काम व संबंधित अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताची चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी युवा विकास सेनेच्या वतीने बुधवारी नळदुर्ग नगरपरिषद कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २४ जून २०२४ रोजी करण्यात आलेल्या करारानुसार सुमारे ₹३५.१८ कोटींचे काम ठरावीक मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
युवा विकास सेनेने करारातील अटींचा भंग झाल्यानंतरही संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई न करता वारंवार मुदतवाढ देण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला संरक्षण दिले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
संघटनेने प्रत्यक्ष पाहणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काँक्रीट व सिमेंटचा वापर, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष, एम.बी. नोंदीतील त्रुटी, संभाव्य ओव्हरबिलिंग तसेच अनेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन काम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'गंभीर प्रश्नांची उत्तरे द्या'
निवेदनात प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. करारातील दंडाची अंमलबजावणी का झाली नाही, वारंवार मुदतवाढ कोणाच्या हितासाठी देण्यात आली, निकृष्ट काम असूनही बिले कोणाच्या दबावाखाली मंजूर झाली आणि संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमत आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
या मागण्या केल्या
युवा विकास सेनेने संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणे, करारानुसार दंडाची वसुली करणे, संपूर्ण प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, निकृष्ट काम तात्काळ दुरुस्त करून दर्जेदार काम पूर्ण करणे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व देयके थांबविण्याची मागणी केली आहे.
संघटनेने इशारा दिला आहे की, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. "जनतेच्या पैशाची लूट आम्ही सहन करणार नाही," असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. या जाहीर निषेध आंदोलनात युवा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, सचिव अकबर शेख, धाराशिव जिल्हा अध्यक्ष रशीद मुजावर, जिल्हा संघटक दादासाहेब कांबळे, नरेश सब्बन, मीर महमूद खान, जब्बार दर्जी, अब्दुल मुजावर आदी उपस्थित होते.
दरम्यान वरील आरोपांबाबत न.प.चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याशी संपर्क साधले असता फोन घेतले नाही.