'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाला गती; तालुकास्तरीय कृती दलाची बैठक; आरोग्य, स्वच्छता, योग व वृक्षारोपणावर भर

तुळजापूरदि.८ जुलै : 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक नुकतीच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात झाली.

 गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्यदायी, स्वच्छ व निरोगी गाव घडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पत्रकार प्रतिनिधी श्रीकांत कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जून महिन्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर कृती दलाच्या बैठका घेऊन शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, सकस आहार व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. किशोरवयीन मुला-मुलींना वैयक्तिक स्वच्छता, जीवन कौशल्य व किशोरवयीन आरोग्य विषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
१० ते १६ जूनदरम्यान नेत्ररोग प्रतिबंध व उपचाराबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

 तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा व ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांमध्ये योगाभ्यासाची सवय वाढविण्यासाठी गावागावात योगाचे महत्त्व पोहोचविण्यावरही भर देण्यात आला.
जून महिना 'हिवताप प्रतिरोध महिना' म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध, स्वच्छतेचे महत्त्व तसेच घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

अभियानाशी संबंधित सर्व अहवाल, छायाचित्रे व नोंदी ग्रामपंचायत, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व्यवस्थित जतन करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
लोकसहभागातून 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जुलै महिन्यातील सर्व नियोजित उपक्रम वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top