उमरगा आगाराचा मनमानी कारभार?; एसटीच्या विलंबामुळे प्रवाशांचा संताप
लांब पल्ल्याच्या बस उशिरा, काही फेऱ्या अचानक रद्द; विद्यार्थी, रुग्ण व भाविकांचे मोठे हाल

नळदुर्ग, दि. १० जुलै : 

राज्य परिवहन महामंडळाच्या उमरगा आगारातून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बसेस निर्धारित वेळेपेक्षा मोठ्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच किरकोळ कारणांवरून काही बसफेऱ्या अचानक रद्द केल्या जात असल्याचा आरोप होत असून, विद्यार्थी, रुग्ण, भाविक व सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उमरगा आगारातून नळदुर्गमार्गे धावणाऱ्या अनेक बस दोन-दोन तास उशिराने नळदुर्ग बसस्थानकात पोहोचत आहेत. परिणामी प्रवाशांना बसस्थानकावर तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. नळदुर्ग परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्यासाठी एसटीवरच अवलंबून असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच सोलापूरसह इतर शहरांत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विलंबाचा फटका बसत आहे. धार्मिक स्थळांकडे जाणारे भाविक व पर्यटक यांनाही या अनियमिततेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

धाराशिव–अक्कलकोट ही उमरगा आगाराची बस नळदुर्ग बसस्थानकातून दुपारी १२ वाजता सुटते. मात्र, ही बस अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रद्द केली जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकाराविरोधात शिवसेना (उबाठा)च्या वतीने दोन आठवड्यांपूर्वी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दि. ९ जुलै रोजी नोंदविण्यात आलेल्या विलंबित बसफेऱ्या पुढीलप्रमाणे :
उमरगा–मुंबई : सायं. ५ वाजताची बस सुमारे ६ वाजता आली.
उमरगा–भिवंडी : सायं. ६ वाजताची बस रात्री ८.२० वाजता दाखल झाली.
उमरगा–बोरीवली : रात्री ८ वाजताची बस १० वाजता आली.
उमरगा–छत्रपती संभाजीनगर : रात्री ८.४५ वाजताची बस ९.१५ वाजता आली.
उमरगा–पुणे : रात्री ९.३० वाजताची बस तब्बल ११.२० वाजता नळदुर्ग बसस्थानकात पोहोचली.

याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या बस जिर्णावस्थेत असून, काही बसवर गंतव्यस्थळाचे फलक (बोर्ड) नसल्याचीही प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून गैरसोयीत आणखी भर पडत आहे.
उमरगा आगारातील या कथित अनियमित कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, बसफेऱ्या वेळेत सुरू ठेवाव्यात व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी नळदुर्ग परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.

अजय पाटील, धाराशिव विभाग नियंत्रक 
मनुष्य बळ कमी असल्याने अडचण निर्माण होवुन गैरसोयी होत आहेत.त्यामुळे बसेस वेळा पत्रक कोलमडत आहे .
 
Top