नशेला नाही, उज्ज्वल भविष्यास होकार’ : कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान

धाराशिव, दि. १६ जुलै :

युवा पिढीला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टासक फोर्स छ.सभाजीनगर कृती विभाग पोलिसांच्या वतीने कृषी महाविद्यालय, आळणी (गडपाटी), ता. जि. धाराशिव येथे नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती देत नशेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दि. १५ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयातील सुमारे १५० ते १७५ विद्यार्थी तसेच ५ प्राध्यापक उपस्थित होते. वाढत्या प्रमाणात युवा पिढी गांजा, अफू, ड्रग्ज तसेच विविध प्रकारच्या अमली गोळ्यांच्या विळख्यात अडकत असल्याची बाब लक्षात घेऊन या व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी व्यसनांना ठाम नकार देत शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम अंमली पदार्थ विरोधी टासक फोर्स छ.सभाजीनगर कृती विभागाचेउपविभागीय पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक सचिन काळे, गीता बागवडे  आणि सपोनि. दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत आणि नागेश केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत प्रभावी मार्गदर्शन केले.
 
Top