नळदुर्ग महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६५ जणांचे रक्तदान; ५३२ रुग्णांची मोफत तपासणी, ३९ मोतीबिंदूग्रस्तांवर होणार विनामूल्य शस्त्रक्रिया
नळदुर्ग, दि. १६ जुलै :
मोहरम पर्वाच्या निमित्ताने पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशन, नळदुर्ग आणि सिद्धेश्वर रक्तपेढी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ५३२ रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये २९४ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली असून ३९ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशनचे शहाबाज काझी यांनी दिली.
ऐतिहासिक किल्ला गेट येथील हजरत शादक शाहवली दर्गा परिसरात बुधवारी (दि. १५ जुलै) दुपारी १२ ते ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बसवराज धरणे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार मनीषा कोळगे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, डॉ. सुरेंद्र मडके, डॉ. जितेंद्र पाटील, नगरसेवक तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, इमाम शेख, रिजवान काझी, प्राचार्य सुभाष राठोड, धनंजय पाटील, माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या सुभद्रा मुळे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक यांच्यासह नागरिक, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत संयोजकाचे कौतुक करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
शिबिरात मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. साजीद सय्यद, सर्जन डॉ. वाहीद शेख, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. इलियाज बेग, मधुमेहतज्ज्ञ डॉ. सोहेल शेख, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नूर शेख, डॉ. नेहारिका रघोजी, डॉ. समीर शेख, डॉ. हासिना शेख, तसेच महेश पवार, सिंधु सुरवसे, तेजस्वनी गुरगुळे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार शहाबाज काझी यांनी मानले. समाजोपयोगी उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला चालना दिल्याबद्दल पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशन व सिद्धेश्वर रक्तपेढीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.