नळदुर्गमध्ये मोकाट डुकरांवर नगरपालिकेचा दणका; मालकांना १५ दिवसांची अंतिम मुदत, अन्यथा कारवाई
नळदुर्ग, दि. १६ जुलै :
नळदुर्ग शहरात मोकाट फिरणाऱ्या वराहांमुळे (डुकरांमुळे) नागरिकांना होणारा वाढता त्रास लक्षात घेऊन नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वराहपालन करणाऱ्या सर्व मालकांना नगरपालिकेत बोलावून बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधितांना नोटिसा बजावत १५ दिवसांच्या आत मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
शहरात मोकाट डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यांवर मुक्तपणे वावरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छताही निर्माण होत असल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने ही विशेष बैठक आयोजित केली.
बैठकीत संबंधित मालकांना डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी काही वराहपालकांनी डुकरांना परप्रांतात सोडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तयारी दर्शविली.
नगरपरिषदेने स्पष्ट इशारा देत शहरातील मोकाट वराह पकडून बंदिस्त करण्यात येणार असून त्यांच्या मालकांची नोंद घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. यासाठी संबंधितांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतरही सूचना न पाळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या बैठकीस नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, नगरसेवक तानाजी जाधव, दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, स्वच्छता मुकादम विकास कांबळे आदी उपस्थित होते. तसेच वराहपालक शिवा कोळी, भिमा कोळी, कोंडिराम कोळी, रमेश कोळी यांच्यासह इतर संबंधित मालकांना यावेळी नगरपालिकेने अधिकृत नोटिसा बजावली.