जळकोटवाडी ग्रामस्थांच्या विविध विकासकामांसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन; अनेक कामांना मंजुरी, उर्वरित लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन
नळदुर्ग, दि. १६ जुलै :
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथील ग्रामस्थांनी स्थानिक विकासकामांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी गावातील मूलभूत सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
जळकोटवाडी अंतर्गत नरखोरी तांडा आणि राणा प्रतापनगर तांडा या दोन वस्तींच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांची मागणी ग्रामस्थांनी केली. नरखोरी तांड्यासाठी सभागृह, पुलासह डांबरीकरण रस्ता आणि स्मशानभूमी शेड, तर राणा प्रतापनगर तांड्यात मंदिरासमोर सभामंडप तसेच अंतर्गत रस्त्यांची उभारणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या मागण्यांवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत काही विकासकामांना तत्काळ मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. उर्वरित प्रलंबित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, भाजप जळकोटवाडी बूथप्रमुख सुरेश वाघदरे, रघुनाथ जाधव, भरत सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, माजी उपसरपंच गोविंद राठोड, सुरेश पवार, वसंत राठोड, अर्जुन राठोड, पवन राठोड, बालाजी राठोड, अशोक राठोड, सुरेश राठोड, लिंबाजी राठोड, मोहन राठोड यांच्यासह ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.