सात दिवसांपासून रामलीला नगर अंधारात; संतप्त नागरिकांचा सोशल मीडियावर उद्रेक
"एका फोनवर काम करणारे नगरसेवक इतर प्रभागात, आमच्या भागाकडे मात्र दुर्लक्ष"; नगराध्यक्षांनाही नागरिकांचा थेट सवाल
नळदुर्ग, दि. १२ जुलै :
नळदुर्ग शहरातील रामलीला नगर परिसर गेल्या सात दिवसांपासून अंधारात बुडाला असून बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकाराविरोधात नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट करत नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. या पोस्ट शहरभर व्हायरल झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रामलीला नगरातील नागरिकांनी, "आम्ही निवडून दिलेले नगरसेवक साधी चौकशीसाठीही फिरकत नाहीत. आता मतदान केल्याचा पश्चात्ताप होत आहे," अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. "प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक एका फोनवर नागरिकांची कामे मार्गी लावतात; मात्र आमच्या प्रभागातील समस्या सोडविण्यास कोणीही पुढे येत नाही," असा आरोपही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
नगराध्यक्षांनाही नागरिकांनी थेट लक्ष्य करत, "संपूर्ण गल्ली अंधारात आहे, शहराचा कारभार नेमका कसा सुरू आहे? विकास होत नसेल तर पदावर राहण्याचा अधिकार काय?" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
याचबरोबर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही नागरिकांनी ऐरणीवर आणला आहे. ओपन जागेत बोअरवेल मंजूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा करत, वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
"प्रत्येक वेळी व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकल्यावरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार का? आपल्या प्रभागात फिरून समस्या जाणून घेण्याची जबाबदारी कोणाची?" असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील या संतप्त प्रतिक्रिया शहरात चर्चेचा विषय ठरल्या असून रामलीला नगरातील बंद पथदिवे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि इतर नागरी समस्यांवर नगरपरिषद प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी तातडीने उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच, भविष्यात अशा तक्रारी सोशल मीडियावर मांडण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.