मोहरमनिमित्त महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन; पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशन व सिद्धेश्वर रक्तपेढीचा संयुक्त उपक्रम; १५ जुलै रोजी नळदुर्ग येथे शिबिर
नळदुर्ग, दि. १२ :
मोहरम पर्वाच्या निमित्ताने पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशन व सिद्धेश्वर रक्तपेढी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथे महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम बुधवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता किल्ला गेट येथील हजरत शादकशाह वली दर्गा परिसरात होणार आहे.
या कार्यक्रमाचे शुभहस्ते जिल्हा उपअधीक्षक मनोहर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे राहणार आहेत.
कार्यक्रमास तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळगे, नायब तहसीलदार मनीषा कोळगे, नळदुर्गचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये सोलापूर येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी व मोफत आरोग्य सल्ला दिला जाणार आहे. तसेच रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन पंचपीर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष काझी शहाबाज यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.