"गाढवाच्या लग्नाची 'व्हीआयपी' वरात; आता ढगांनी तरी निमंत्रण स्वीकारावं!"
पाऊस पाडण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट फॉर्म्युला; वर गाढव, वधू गाढवी आणि वरातीत अख्खं गाव!

नळदुर्ग,दि.११:

तुळजापूर तालुक्यातील लोहगावकरांनी यंदा हवामान खात्याला, अल निनोला आणि व्हॉट्सॲपवरील "यंदा पाऊस धुवाधार पडणार!" या तज्ज्ञांना एकदम साईडला करत थेट इंद्रदेवांनाच 'इमर्जन्सी इन्व्हिटेशन' पाठवलं.

 माध्यम मात्र हटके... गाढवाचं लग्न!
गावभर ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, "वर आला... वर आला!" चा जल्लोष आणि वर म्हणून मिरवत चाललेलं गाढव! वधूही काही कमी नव्हती. अगदी साडी-हार घालून सजलेली. दोघांचं लग्न लावलं गेलं आणि वरातही काढण्यात आली. 

लोहगाव गावातील महादेव मंदिरात भटजींच्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात हा अनोखा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. वर गाढव आणि वधू गाढवी यांचा विधीवत विवाह लावण्यात आला. मंगलाष्टकांच्या गजरात अक्षता उधळल्या गेल्या, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि "शुभमंगल सावधान"चा आवाज घुमताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
यानंतर लग्नाची भव्य वरात संपूर्ण गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. गुलालाची उधळण, नाच-गाणे आणि जल्लोषात गावकरी सहभागी झाले. इतकेच नव्हे तर आख्या गावातील वरातीला पारंपरिक जेवणावळीचाही बेत ठेवण्यात आला.


पाहणाऱ्यांनी मोबाईल बाहेर काढले, तर काहींनी इंद्रदेवांना टॅग करून मनोमन म्हणलं, "आता तरी रिप्लाय द्या!"

पाऊसा, तुझ्यासाठी एवढं केलं... आता तरी ये!
पावसाने इतका 'सीन' मारला की शेतकऱ्यांनी शेवटी गाढवांच्याच प्रेमकहाणीवर भरवसा ठेवला. बियाणं घरात, ट्रॅक्टर शेतात, शेतकरी आकाशाकडे आणि ढग मात्र कुठे 'ऑफलाइन'!
गावकऱ्यांचं म्हणणंही रास्तच...

"आम्ही हवामान ॲप पाहिलं... अंदाज चुकला. टीव्ही पाहिला... तिथेही चुकला. शेवटी परंपरा आठवली. आता गाढवाच्या लग्नानंतर तरी पाऊस यायलाच हवा!"

इंद्रदेवांनाही कदाचित मेसेज गेला असेल...
"प्रिय इंद्रदेवा, लोहोगाव येथे गाढवाच्या लग्नाचा शुभमुहूर्त पार पडला आहे. कृपया उपस्थित राहून पावसाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा.  आपलेच, तहानलेले शेतकरी."

शेवटी...
ही परंपरा अंधश्रद्धेपेक्षा निसर्गाकडे आर्त साद घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनांचं प्रतीक आहे. शेतकरी हसत आहेत, वरात काढत आहेत; पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कोरड्या जमिनीची वेदना दडलेली आहे.
आता एकच प्रश्न... गाढवाचं लग्न तर झालं... आता पावसाचं "आगमन सोहळा" कधी? 🌧️
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top