युवकांनी नशेपासून दूर राहावे; पोलिसांकडून जनजागृतीचा संदेश ; रुईभर येथील शाळेत अंमली पदार्थविरोधी अभियान; विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ
धाराशिव, दि. १३ :
छत्रपती संभाजीनगर कृती विभागांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील रुईभर (ता. धाराशिव) येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवा पिढीला नशेच्या विळख्यातून दूर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन मिळून सुमारे १५० ते २०० विद्यार्थी तसेच सात प्राध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गांजा, अफू, ड्रग्ज, नशेच्या गोळ्या आदी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
हा जनजागृती कार्यक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली पाटील व जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन व जनजागृती पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे आणि योगेश सरफळे यांनी केले.
अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी सजग नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यास हातभार लावावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.