नळदुर्ग नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना हिरवा कंदील

जिल्हा वार्षिक योजना, पथदिवे, नव्या अंगणवाड्या, बोरी नदी संवर्धन, पदभरतीसह महत्त्वाच्या ११ विषयांना सर्वानुमते मंजुरी

नळदुर्ग, दि. १३ जुलै :
नळदुर्ग नगरपरिषदेच्या दि. ८ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे, कर्मचारी भरती, नगरपरिषदेची नवी इमारत, बोरी नदी संवर्धन, माजी सैनिकांना करसवलत तसेच पथदिवे उभारणीसह एकूण ११ विषयांना सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली. त्यामुळे शहराच्या विकासाला नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सभेच्या प्रारंभी दि. २१ एप्रिल २०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत कायम करण्यात आला. त्यानंतर सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
शहरातील रस्त्यांवर 'वैशिष्ट्यपूर्ण योजना' अंतर्गत आधुनिक पथदिवे उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला. तसेच प्रत्येक प्रभागात किमान एक नवीन अंगणवाडी सुरू करण्याच्या प्रस्तावालाही सभागृहाने मान्यता दिली.

नगरपरिषदेसाठी अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला. हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान अथवा हुतात्मा बाबुराव बोरंगावकर उद्यान परिसरात शासनाच्या योजनेतून नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बोरी नदीतील साचलेला गाळ, झाडे-झुडपे काढून नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह बोरी घाट ते किल्ला गेट परिसराचे सुशोभीकरण, उद्यान निर्मिती व नदी संवर्धनासाठी शासनाच्या विशेष योजनेतून निधी मिळविण्यालाही मंजुरी देण्यात आली.

नगरपरिषदेविरुद्ध विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या प्रकरणांसाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णयही सभागृहाने घेतला. यासाठी प्राप्त अर्जांमधून विधिज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
शहरातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करासह नगरपरिषदेचे सर्व कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सभागृहाने घेतला. शासनाच्या निर्देशानुसार ही सवलत लागू करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेतील रिक्त असलेल्या पंप ऑपरेटर, विजतंत्री, सहाय्यक ग्रंथपाल व फायरमन अशा एकूण पाच पदांच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीस अधिकार देण्यास मंजुरी देण्यात आली. शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचारी जनार्धन शंकर कांबळे यांचे वारस ऋषीकेश कांबळे यांना तसेच किशोर कोंडीबा बनसोडे यांच्या पत्नी ज्योत्सना बनसोडे यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासही सभागृहाने मंजुरी दिली.
दरम्यान, ऐनवेळीच्या विषयात नानीमी रोड ते बालाघाट रोड या मार्गास दिवंगत माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक निर्णय या सभेत एकमताने झाल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
Top