महामार्गावरील फुलवाडी पाटीजवळ प्रवाशाला लुटले; एकास अटक; चाकू व लोखंडी टॉमीचा धाक दाखवून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास; कबुली जबाबानंतर पोलिसांची कारवाई

नळदुर्ग ,दि.१३:

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील फुलवाडी पाटीजवळ कारमध्ये विश्रांती घेत असलेल्या प्रवाशास चाकू व लोखंडी टॉमीचा धाक दाखवत मारहाण करून १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत संजीव रेड्डी (वय ३०, रा. एलआयजी-२१, हाउसिंग बोर्ड कॉलनी, हुमनाबाद, जि. बिदर) हे आपल्या मित्रासह कारने हुमनाबादहून पुण्याकडे जात होते. शनिवारी (दि. ११) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी पाटीजवळ राष्ट्रीय महामार्गालगत विश्रांतीसाठी कार थांबविली होती.
यावेळी चार अनोळखी इसमांनी कारजवळ येऊन चाकू व लोखंडी टॉमीचा धाक दाखवत कारची काच उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर लोखंडी टॉमीने मारहाण करून रोख १५ हजार रुपये, एक तोळ्याची सोन्याची चैन, दोन तोळ्यांचा चांदीचा कडा व मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.
या प्रकरणी अभिजीत रेड्डी यांनी रविवारी (दि. १२) दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जाविद इमाम सय्यद (वय ३३, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून, पुढील तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top