"जमिनीच्या न्यायहक्कासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; न्यायालयीन आदेशाच्या अवमानाचा आरोप, उदया नळदुर्गात सहकुटुंब अन्नत्याग आंदोलन"
नळदुर्ग, दि. १४ जुलै:
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ (नळदुर्ग–अक्कलकोट) रस्त्याच्या भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार (दि. १५ जुलै) रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर सहकुटुंब अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या आंदोलनाबाबत यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यात बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाचे पालन न करता संबंधित प्रशासनाकडून वारंवार पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला.
समितीच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, उपअधीक्षक भूमि अभिलेख तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी न्यायालयीन आदेशांचा अवमान करून बाधित शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीने पोलीस निरीक्षक, नळदुर्ग पोलीस ठाणे यांना अन्नत्याग आंदोलनाचे निवेदन दिले असून, या आंदोलनात बाधित शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे
दिलीप जोशी, सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, पंडीत पाटील, पंडीत निकम, लक्ष्मण निकम, खंडु हालकंबे, काशिनाथ काळे, दिलीप पाटील, तोलु पाटील, गणपत सुरवसे, सचिन जवळगे, महेश घोडके, बालाजी ठाकुर, आजमोददीन शेख, पिरपाशा ईनामदार, पंडीत निकम, श्रीकात पोतदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील , अपर तहसिलदार प्रमोद गायकवाड, पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे शेतकरी संघर्ष समितीने केलेले असून, संबंधित प्रशासन किंवा अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.