३३ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक गुलाब सय्यद यांचा नागरी सत्कार;  कर्तव्यनिष्ठ शिक्षकाच्या सेवेला नागरिकांचा सलाम; शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव

नळदुर्ग, दि. १६ जुलै :

राजीव गांधी विद्यालय, हंगरगा (नळ) ता. तुळजापूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब सय्यद यांनी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे नगर, नळदुर्ग येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे दिलेल्या योगदानाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत सय्यद यांच्या कार्याचा गौरव केला.

शिक्षण महर्षी सिद्रामप्पा आलूरे गुरुजी यांच्या शैक्षणिक संस्थेतून सन १९९२ मध्ये खुदावाडी येथे शिक्षक म्हणून गुलाब सय्यद यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर होर्टी येथे तब्बल १२ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. पुढे अणदूर येथील जवाहर विद्यालयात साडेतीन वर्षे अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर हंगरगा (नळ) येथील राजीव गांधी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, विद्यार्थीकेंद्री आणि संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसह पालक आणि सहकाऱ्यांच्या मनातही विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक पिढ्यांना झाला.
सत्कार सोहळ्यात निवृत्त शिक्षक गोपीनाथ माने आणि निवृत्त नेत्रचिकित्सक डॉ. आनंद काटकर यांनी गुलाब सय्यद यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानाचे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी गुलाब सय्यद यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमास अनिल करपे, दत्तात्रय माने, दाऊद नदाफ, डॉ. आनंद काटकर, गोपीनाथ माने, अशोक लोहार, भगवंत सुरवसे, अजय देशपांडे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे नगरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी सय्यद यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
 
Top