प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन; तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी

अणदूर ,दि.१५ जुलै: 

अणदूर शहरातील वाढते अतिक्रमण, बिघडलेली स्वच्छता व्यवस्था आणि अवैध दारूविक्रीच्या विरोधात संतप्त युवकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. विविध नागरी समस्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी  केली.

आंदोलनकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून नागरिकांना रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे सांगितले. तसेच अनेक भागांतील अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत युवकांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून अवैध व्यवसाय तातडीने बंद करावा, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने राबविणे, स्वच्छता व्यवस्था नियमित करणे आणि अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे या प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवकांनी दिला.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
 
Top