जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा विजय ; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अर्जुन अरोरा बनले नायब तहसीलदार; नळदुर्गमध्ये गौरव
नळदुर्ग, दि. १७ जुलै :
प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करून नायब तहसीलदारपदी विराजमान झालेल्या अर्जुन प्रतापसिंह अरोरा यांचा नळदुर्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे येथील अर्जुन अरोरा हे यापूर्वी तहसील कार्यालयात गट 'क' पदावर कार्यरत होते. बालवयातच त्यांच्या आयुष्यावर दुर्दैवाचा मोठा आघात झाला. अवघ्या दहा वर्षांचे असताना त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावले. त्यानंतर वडिलांच्या मित्रांच्या आधाराने रानात मिळेल ती कामे करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.
लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत यशाचे शिखर गाठले. त्यांची अक्कलकोट तालुक्यात निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी १ जुलै रोजी पदभार स्वीकारला आहे.
अठराविश्व दारिद्र्य आणि संकटांवर मात करून अधिकारीपदापर्यंत पोहोचलेल्या अर्जुन अरोरा यांच्या संघर्षमय प्रवासाने उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांच्या यशाबद्दल नळदुर्ग परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नळदुर्ग बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे, उमाकांत कुंभार, दत्ता रोकडे, दिलीप पवार, वाहक वंदना धुमाळ, लक्ष्फुमी लारी आदी उपस्थित होते.