डिजिटल कौशल्ये आत्मसात करा; आत्मनिर्भरतेचा तोच मार्ग : डॉ. गिरीधर सोमवंशी
मुरुम, दि. १७ जुलै :
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानप्रधान युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून, डिजिटल कौशल्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंचालक एनसीसी कार्यालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा व सामुदायिक विकास विभागाच्या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
मार्गदर्शन करताना डॉ. सोमवंशी म्हणाले की, प्राचीन कौशल्यांची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून भारतीय युवकांच्या क्षमता, नवकल्पना आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. आजचे जग संगणक, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या वेगवान बदलांनी व्यापलेले आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे ही प्रत्येक तरुणाची गरज बनली आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असल्याने प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे कौशल्याधारित शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे युवकांनी वळले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या 'स्किल इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया' यांसारख्या उपक्रमांद्वारे विविध तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध होत असून त्याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कला, हस्तकला, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिकल, उद्योग-व्यवसाय तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन युवकांनी स्वतःला सक्षम बनवावे. शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता आत्मनिर्भरतेकडे नेणारी कौशल्ये विकसित करणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय अस्वले होते. प्रास्ताविक कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले, तर आभार अर्जुन पाचंगे यांनी मानले. यावेळी डॉ. पद्माकर पिटले, डॉ. विनोद देवरकर, प्रा. घंटे, प्रा. म्हेत्रे यांच्यासह एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.