अनाथाश्रमातील मुलांसोबत अनुभवला मायेचा ओलावा; स्नेहाच्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले
रुपाली शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उमरगा, दि. १७ जुलै :
वाढदिवसाचा आनंद केवळ केक कापून न साजरा करता तो समाजातील वंचित मुलांसोबत वाटून घेतल्यास त्याला खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची जोड मिळते. याच भावनेतून व्ही.व्ही.ए. फाऊंडेशनच्या संचालिका सौ. रुपालीताई शिवाजी शिंदे यांनी आपल्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त एकुरगावाडी (ता. उमरगा) येथील ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ, कदेर संचलित तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे बालगृह येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस आदर्शवत साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मंडळाच्या सौ. मीराताई मोटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापिका सौ. विजयाताई बेलकेरी, विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, उमरगा तालुका ग्राहक पंचायतचे संघटक धनराज शिंदे, मुख्याध्यापक गोविंद शिंदे, भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातील सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे, ऐश्वर्या शिंदे, योगेश पांचाळ, सूर्यकांत कावळे, पद्मावती शिंदे, सारिका कटके, सुलभा कटके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात केक कापून झाली. यावेळी शिवाजी शिंदे व रुपाली शिंदे या दाम्पत्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना प्रा. विजयाताई बेलकेरी, डॉ. सुधीर पंचगल्ले आणि डॉ. महेश मोटे यांनी सामाजिक जाणीव जपत वाढदिवसाचे औचित्य साधल्याबद्दल शिंदे दाम्पत्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात सौ. मीराताई मोटे यांनी अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले.
मायेच्या स्पर्शाने उजळले निरागस चेहरे
वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांनी बालगृहातील मुलांसोबत वेळ घालवत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मुलांसाठी एक वेळच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेम, आपुलकी आणि स्नेहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. या स्नेहभेटीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध हस्तकला साहित्यकृती आणि कलाविष्कारांचे प्रदर्शनही सादर केले. त्यांच्या कल्पकतेचे उपस्थितांनी कौतुक केले. आश्रमातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा सर्वात मोठा ठेवा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. या उपक्रमासाठी राजेंद्र कटके, रेवण कटके, वैभव कटके, गोविंद कटके आणि रोहन शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला. सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले, तर आभार गोविंद शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, बालगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.