लोहगावची अंधारातून उजेडाकडे वाटचाल! थ्री-फेज सेपरेट फिडरचे लोकार्पण; २४ तास दर्जेदार वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा

नळदुर्ग, दि. १८ जुलै :

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना आता अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार असून, बोरगाव उपकेंद्रातून लोहगावसाठी उभारण्यात आलेल्या थ्री-फेज गावठाण सेपरेट फिडरचे शुक्रवारी (दि. १७) ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

लोहगावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण बसवराज पाटील यांनी गावातील वीजपुरवठ्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत ग्रामीण विकास सेवा योजनेअंतर्गत लोहगावचा समावेश करण्यात आला. या योजनेतून बोरगाव उपकेंद्रातून गावठाणासाठी स्वतंत्र थ्री-फेज फिडर उभारण्यात आला असून, नवीन मुख्य वीजवाहिनीवर १०० केव्हीए क्षमतेचे आठ ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.

या नव्या योजनेमुळे लोहगावला आता २४ तास अखंडित थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. गावठाण आणि शेतीपंपांचा वीजभार स्वतंत्र झाल्यामुळे कृषीपंपांचा वीजपुरवठाही अधिक सुरळीत होणार आहे. तसेच पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप, दूध डेअरी, कोल्ड्रिंक्ससह विविध लघुउद्योगांना चालना मिळणार असून, गावातील पाणीपुरवठा योजना अधिक प्रभावीपणे कार्यान्वित होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या युवकांनाही याचा मोठा लाभ होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकार्पण कार्यक्रमास सरपंच प्रवीण बसवराज पाटील, उपसरपंच प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर, श्रीकांत माने, सचिन काटकर, ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत लांडगे यांच्यासह विजयकुमार देशमुख, प्रेमनाथ मारेकर, सोपान मारेकर, अमोल कुंभार, प्रकाश पाटील, अरविंद काटकर, अतुल पाटील, उद्धव इंगोले, नेताजी दबडे, बालाजी इंगोले, नितीन दबडे, भीम मारेकर, नितीन काटकर, केशव मारेकर, मोहन दबडे, शिवानंद कलशेट्टी, अशोक बिराजदार, आप्पाराव होळे, दिगंबर फडताळे, दत्तात्रय सोमवंशी, नितीन स्वामी, प्रभाकर कलशेट्टी, लक्ष्मण कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी अभियंता काळे, सहाय्यक अभियंता निर्मळे, उपअभियंता चाफेकर, सहाय्यक अभियंता तगारे, भोसले, रोडगे, शिवाजी जाधव, स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणारे शिवराम भोसले तसेच लोहगावचे कार्यक्षम लाईनमन रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी या योजनेमुळे लोहगावच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top