मोकाट डुकरांना 'नो एन्ट्री ; अस्वच्छतेवर नगरपालिकेचा दणका! मोकाट डुकर शहराबाहेर हलविण्यास प्रारंभ 

नळदुर्ग, दि. १९ जुलै :

नळदुर्ग शहरातील मोकाट डुकरांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात नगरपालिकेने अखेर कठोर भूमिका घेत व्यापक विशेष मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून शहरभर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मोकाट डुकरांना पकडून शहराबाहेर हलविण्यात येत असून, शहराला स्वच्छ, सुरक्षित व डुक्करमुक्त करण्याच्या दिशेने प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे.
शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच निवासी भागांमध्ये मोकाट डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता, संसर्गजन्य आजारांचा धोका आणि अपघातांचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत नगरपालिकेकडे सातत्याने तक्रारी दाखल होत होत्या. नागरिकांच्या वाढत्या नाराजीची दखल घेत प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,  मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर तसेच इतर नगरसेवकांनी डुक्करपालकांची बैठक घेऊन मोकाट डुकरे तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधितांना नोटिसा बजावून नियमांचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

यानंतर डुकर पालक प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करत पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने मोकाट डुकरे पकडून शहराबाहेर हलविली. ही मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डुक्करपालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नगरपालिकेच्या निर्णयाचे  शहरवासीयांनी स्वागत केले असून, मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि स्वच्छ, सुंदर व सुरक्षित नळदुर्ग घडविण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
Top