नळदुर्गच्या इतिहासात प्रथमच 'जनता दरबार'; ६७ तक्रारींची नोंद, तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक शनिवारी शहरातील विविध भागांत होणार आयोजन

नळदुर्ग, दि. १९ जुलै :

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने नळदुर्ग नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुर्गानगर-वसंतनगर प्रभाग क्र. १ येथे शनिवारी (दि. १८) झालेल्या या उपक्रमात एकूण ६७ तक्रारींची नोंद करण्यात आली असून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली.
वसंतनगर येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर सभामंडपात झालेल्या जनता दरबारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, स्वच्छता, बंद पथदिवे, नागरी सुविधा यांसह विविध विषयांवरील तक्रारी नागरिकांनी मांडल्या. युवकांनी वसंतनगर येथील हॉलीबॉल क्रीडांगणाची दुरुस्ती करण्याची मागणी केली असता नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी स्वखर्चातून क्रीडांगण दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले.

दरबारात आलेल्या प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निवारणासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, नगरसेवक निरंजन राठोड, तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, रिजवान काझी, नगरसेविका छमाताई राठोड, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, बलदेव ठाकूर, दत्ता राठोड, फुलचंद राठोड, लक्ष्मण चव्हाण, शिवाजी चव्हाण, गुणाबाई जाधव, दिगंबर गायकवाड, शंकर दुर्लेकर, महेश पवार, भिमा दुर्लेकर, बालाजी बंडगर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्ष बसवराज धरणे म्हणाले, "जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यात येईल. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात," असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच वसंतनगरात प्रत्यक्ष जनता दरबार भरविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. केवळ तक्रारींची नोंद न राहता त्यांचे प्रत्यक्ष निराकरण व्हावे, अशी अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार यापुढे दर शनिवारी शहरातील विविध भागांत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकांच्या प्रश्नांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले.



 
Top