ब्रेक फेल झाल्याने छोटा हत्ती पलटी; चालकासह सहा सेंट्रींग कामगार जखमी
तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावरील मानेवाडी-हगलूर पाटीदरम्यान अपघात; जखमींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार
नळदुर्ग, दि. १९ जुलै :
तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावरील मानेवाडी-हगलूर पाटीदरम्यान रविवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने सेंट्रींग कामगारांना घेऊन जाणारा छोटा हत्ती (क्र. एम.एच २५ पी २३११) पलटी झाला. या भीषण अपघातात चालकासह सहा कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट येथून नळदुर्ग मार्गे धाराशिवकडे सेंट्रींग कामगारांना घेऊन जाणारा छोटा हत्ती तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील मानेवाडी-हगलूर पाटीदरम्यान पोहोचला असता अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने छोटा हत्ती रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली.
या अपघातात नंदूबाई गुंजाराव कराळे (वय ५०, रा. शेकापूर, ता. जि. धाराशिव), अगलु दत्ता पवार (वय १५, रा. पारधीवाडी, धाराशिव), मंगल प्रकाश गोरवे (वय ४२, रा. राघूचीवाडी, ता. जि. धाराशिव), नितीन चंदू काळे (वय ३०, रा. पारधीवाडी, ता. जि. धाराशिव), विजय सतीश काळे (वय १२, रा. पारधीवाडी, ता. जि. धाराशिव) आणि बालाजी नागनाथ नामणस (वय ३६, रा. राघूचीवाडी, ता. जि. धाराशिव) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पॉईंट येथील जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्याने जखमींवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. या अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास संबंधित यंत्रणा करीत आहे.