शतकपूर्ती वर्षानिमित्त कल्याणात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे उद्घाटन; भव्य महारक्तदान शिबिराचेही आयोजन

कल्याण, दि. १९ जुलै :

अॉल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात सोमवार, दि. २० जुलै रोजी स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन तसेच भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या नवीन बॅचचे उद्घाटन दुपारी २ वाजता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त (घनकचरा व पर्यावरण विभाग) रामदास कोकरे यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्वच्छता क्षेत्रातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

याच निमित्ताने कल्याण विभागीय केंद्राच्या वतीने भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कल्याण (पूर्व) येथील महापालिका वार्ड क्रमांक ४-जे विभागीय कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अॉल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे कल्याण विभागीय संचालक मारुती खोडके यांनी केले आहे. संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Top