शिक्षणाचे लेणे गरजूंच्या दारी; संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून विद्यार्थिनींना पुस्तकांचे वाटप

मुरूम, ता. उमरगा, दि. २० :

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने राबविलेला शालेय पुस्तक वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. 

जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (दि. १९) झालेल्या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या गरजू विद्यार्थिनींना मोफत पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
आजच्या वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक गुणवंत विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे आवश्यक शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनींना पुस्तकांचा आधार दिला. पुस्तकांचे संच मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विजया बेलकेरी होत्या. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, संत निरंकारी मिशन हे केवळ अध्यात्माचा संदेश देणारे संघटन नसून मानवसेवा, शिक्षण आणि समाजहिताच्या कार्यातही सातत्याने पुढाकार घेत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या कार्यात मोलाचे योगदान देणे होय.मोफत पुस्तक वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळा दूर झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी मुक्तकंठाने कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक संत निरंकारी मिशनच्या सेवा समितीचे पदाधिकारी व सेवादारांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, रोटरी क्लब मुरूमचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, ब्रांच मुखी दयानंद साखरे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका सोनाली कलशेट्टी, मीरा मोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरूम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीला पुस्तक संचाचे वितरण प्रा. विजया बेलकेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनाली कलशेट्टी, मीरा मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. महेश मोटे व दयानंद साखरे उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top