नळदुर्ग पोलिसांची 'सिंगम' स्टाईल कामगिरी!; मध्यप्रदेशातून आंतरराज्य चोरट्याला बेड्या, न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल मूळ मालकाला परत
नळदुर्ग, दि. २१ जुलै: (अझहर शेख) :
लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स चोरून पसार झालेल्या आंतरराज्यीय चोरट्याचा नळदुर्ग पोलिसांनी शिताफीने माग काढत थेट मध्यप्रदेशातून त्याला अटक केली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेली रोकड न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकाला परत करण्यात आली असून, नळदुर्ग पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हडपसर (पुणे) येथे वास्तव्यास असलेले व मूळ माळशिरस (जि. सोलापूर) येथील धनराज शिवराज कोरे (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह 'पूजा ट्रॅव्हल्स' (क्र. MH-24 BW-6006) या लक्झरी बसने प्रवास करीत होते. २० मे २०२६ रोजी पहाटे १.५० वाजण्याच्या सुमारास बस नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवाडी टोलनाक्याजवळील हॉटेल येथे थांबली. त्यावेळी कोरे यांच्या पत्नीने आपली लेडीज पर्स सीटवर ठेवून खाली उतरताच अज्ञात चोरट्याने बसमध्ये प्रवेश करून पर्स लंपास केली.
चोरी झालेल्या पर्समध्ये सुमारे ८ ग्रॅम वजनाचे ₹४५ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे ३ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ₹३३,७५०), रोख ₹४,५०० असा एकूण ₹८३,२५० किमतीचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २४४/२०२६ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप मेघराज राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तपासादरम्यान आरोपी मध्यप्रदेशात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली.
तपासात आरोपीने चोरीतील सोन्याचे दागिने विकून ₹१ लाख ९५ हजार रुपये मिळविल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून ही संपूर्ण रक्कम जप्त करून न्यायालयात सादर केली.
दरम्यान, फिर्यादी धनराज कोरे यांनी जप्त रक्कम परत मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय (कोर्ट क्र. २) यांनी Cri.M.A. No. 105/2026 मध्ये सदर रक्कम अंतरिम स्वरूपात मूळ मालकाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत धनराज कोरे व त्यांच्या पत्नी यांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेली रक्कम आणि मालमत्ता परत मिळाल्याने कोरे कुटुंबाने नळदुर्ग पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करण्यापासून ते मुद्देमाल मूळ मालकाला परत मिळवून देण्यापर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप मेघराज राठोड व प्रवीण सुभाष राठोड यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. नळदुर्ग पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्यीय गुन्हेगारांमध्येही पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.