विद्यार्थिनींसाठी दिलासादायक निर्णय! नळदुर्गमध्ये महाविद्यालयापर्यंत मोफत एसटी पास सेवा सुरू
युवासेनेच्या पाठपुराव्याला यश; अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींना कॉलेजपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा
नळदुर्ग, दि. २१ जुलै :
नळदुर्ग शहरातील एसटी बसस्थानकापासून बालाघाट महाविद्यालयाचे सुमारे दोन किलोमीटर अंतर असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज पायी चालत महाविद्यालय गाठावे लागत होते. विशेषतः विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर त्यांच्या समस्येवर सकारात्मक तोडगा निघाला असून, अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयापर्यंत मोफत एसटी पास सेवा सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी युवासेना जिल्हा सरचिटणीस निखिल घोडके यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत घोडके यांनी धाराशिव राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अजय पाटील यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थिनींच्या हिताचा विचार करून पाटील यांनी तात्काळ निर्णय घेत अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयाची अंमलबजावणी करत मंगळवार (दि. २१ जुलै) पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाजवळील एसटी थांब्यावर विद्यार्थिनींना मोफत पास देण्यासाठी अर्ज वाटप व पास वितरणास प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा वेळ, खर्च आणि प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने विद्यार्थिनी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उपक्रमासाठी युवासेना जिल्हा सरचिटणीस निखिल घोडके, तुळजापूर आगार प्रमुख महेश रामपुरे, वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, महेश डुकरे, तालुका संघटक अमर पाटील, युवासेना शहरप्रमुख आकाश कांबळे तसेच शहर समन्वयक योगेश पवार यांनी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमाबद्दल पालक, बालाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड तसेच विद्यार्थिनींनी राज्य परिवहन महामंडळ व युवासेनेचे आभार व्यक्त केले.