विद्यार्थिनींच्या शिक्षणाला एसटीची साथ!
बालाघाट महाविद्यालयात जाऊन मोफत पाससाठी अर्ज व ओळखपत्रांचे वाटप; पायपीट थांबणार, वेळेची बचत होणार

नळदुर्ग, दि. २१ जुलै :

ग्रामीण भागातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने नळदुर्ग एस.टी. बसस्थानकाच्या प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 

नळदुर्ग एस.टी. बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे यांनी बालाघाट महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थिनींसाठी 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजने' अंतर्गत पास काढण्यासाठी आवश्यक अर्ज व ओळखपत्रांची प्रक्रिया महाविद्यालयातच उपलब्ध करून दिली.

विभागीय नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर, आगार प्रमुख महेश रामपुरे आणि अकाउंटंट सुधीर बामनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष राठोड यांच्याकडे आवश्यक फॉर्म व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.

या योजनेमुळे नळदुर्ग शहरातून बालाघाट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार असून, दररोजची पायपीट टळणार आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा इतर प्रतिकूल हवामानात होणारा त्रास कमी होऊन त्यांचा वेळ वाचणार आहे. प्रवासाची चिंता कमी झाल्याने विद्यार्थिनींना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून स्वागत होत असून, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी एसटी प्रशासनाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.
 
Top