आधुनिक 'राजमाता जिजाऊ' बसांचे नळदुर्गात जल्लोषात स्वागत; तुळजापूर आगाराच्या नव्या बससेवेचा शुभारंभ; प्रवाशांना मिळणार सुरक्षित, आरामदायी प्रवास
नळदुर्ग, दि. ५ जुलै :
राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगारासाठी उपलब्ध झालेल्या नव्या 'राजमाता जिजाऊ' बसांपैकी पहिल्या बसफेरीचे रविवारी नळदुर्ग एसटी बसस्थानकात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. बसचे पूजन करून पेढे वाटत कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
राज्य परिवहन महामंडळाने तुळजापूर आगारासाठी पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बसांचे लोकार्पण केल्यानंतर त्यापैकी दोन बस तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर सेवेत दाखल झाली आहे. या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसमध्ये थ्री बाय टू आसन व्यवस्था असून ५६ प्रवाशांची आसन क्षमता आहे. ग्रामीण भागातून शहरात ये-जा करणारे विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा अधिक सोयीस्कर व विश्वासार्ह ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी नळदुर्गचे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांच्या हस्ते नव्या बसचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रसंगी बसचे चालक पी. एस. मंडलिक, जे. एस. निकम, वाहक बी. बी. कांबळे, तांबोळी मॅडम, कर्मचारी लहु देडे, अमर जमादार, इंजमाम शेख, भारत त्रिमुखे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. नव्या बससेवेच्या प्रारंभामुळे परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त करत राज्य परिवहन महामंडळाचे स्वागत केले.