भागवत कथा श्रवण करणे हे पुण्याचे काम; जीवनाला योग्य दिशा देणारी भागवत – वे.शा.सं. श्रीराम जोशी महाराज

नळदुर्ग, दि. २४ :

नळदुर्ग येथील श्री. वसंतराव अहंकारी यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या श्रीमद्भागवत सप्ताहात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, दररोज मोठ्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित राहून भागवत कथेचा लाभ घेत आहेत.
दि. २३ जुलैपासून सुरू झालेला हा सप्ताह भक्तिमय वातावरणात रंगत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

भागवत सप्ताहात वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. श्रीराम जोशी महाराज आपल्या अमृतमय वाणीतून श्रीमद्भागवत कथानिरूपण करत असून, त्यांच्या प्रभावी व ओघवत्या शैलीमुळे श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होत आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीराम जोशी महाराज म्हणाले, "भागवत कथा श्रवण करणे हे पुण्याचे कार्य आहे. हिंदू धर्मात श्रीमद्भागवताला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, मनुष्याने जीवनात कसे जगावे, कसे वागावे, धर्माचे आचरण कसे करावे आणि सदाचाराचा मार्ग कोणता, याचे संपूर्ण सार भागवत कथेमध्ये सांगितले आहे." त्यांच्या या विचारांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

विशेष म्हणजे, गेल्या २३ वर्षांपासून श्रीराम जोशी महाराज नळदुर्ग येथे नियमितपणे भागवत कथा सांगण्यासाठी येत असून, त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक आवर्जून उपस्थित राहत आहेत.

दि. २३ ते २९ जुलै या कालावधीत हा श्रीमद्भागवत सप्ताह संपन्न होत असून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत सप्ताहाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अहंकारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
 
Top