विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नळदुर्ग बंद शांततेत; NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

नळदुर्ग, दि. २३ जुलै ( अझहर शेख) : 

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी नळदुर्ग बंदचे आवाहन करण्यात आले. 

या बंदला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात दिवसभर शांततेत  बंद पाळण्यात आला.
शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी दुकाने, हॉटेल्स व विविध व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या. दरम्यान, संविधान चौक येथे महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणात लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनादरम्यान वक्त्यांनी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीहल्ला लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अस्वीकार्य असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनाच्या शेवटी शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा सुरूच राहील आणि गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

 आंदोलनात कमलाकर चव्हाण,सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, राजेंद्र जाधव,ताजोद्दीन शेख, नगरसेवक इमाम शेख, गफूर हाजी, अझहर जगीरदार,  अरुण लोखंडे, एस.के.गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते,  नागरिक  सहभागी झाले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top