जनतेच्या दारी नळदुर्ग नगरपालिका; इंदिरानगरच्या 'जनता दरबारा'त ३३ तक्रारी, 
 काही तक्रारी जागेवरच निकाली

नळदुर्ग, दि. २५ जुलै :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २ मधील इंदिरानगर सभागृहात शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

या दरबारात विविध नागरी सुविधांशी संबंधित ३३ तक्रारींची नोंद करण्यात आली. यापैकी काही तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणांवर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली.
जनता दरबारात शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी, शहरातून जाणाऱ्या खंडोबा रोडवर गतीरोधक उभारणे, घरासमोरून गेलेल्या धोकादायक वीजवाहिन्या सुरक्षित करणे, वीज समस्या , बुजलेल्या गटार-नाल्यांची स्वच्छता, तसेच विविध मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या.

प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. नागरिकांच्या अडचणी संयमाने ऐकून त्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, शिवसेना (शिंदे गट) नेते ज्ञानेश्वर घोडके, नगरसेविका सुमन ठाकूर, नगरसेवक निरंजन राठोड, शशिकांत पुदाले, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, बलदेव ठाकूर,  धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, सुदर्शन पुराणिक, विशाल डुकरे, अभिजित लाटे, संदीप गायकवाड, रियाज शेख, सौदागर कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले की, "जनता दरबारात प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यात येईल. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल."

प्रभागनिहाय जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत असून, शहरातील विविध भागांत अशाच प्रकारचे जनता दरबार नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
 
Top