आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग शहरात चिकन व मटन दुकाने बंद ठेवण्याची मागणी
सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन; धार्मिक भावना जपण्यासाठी कारवाईची अपेक्षा
नळदुर्ग, दि. २४ जुलै :
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त नळदुर्ग शहरातील सर्व मटन, चिकन व इतर मांसविक्रीची दुकाने शनिवार (दि. २५) रोजी एक दिवस बंद ठेवावीत, अशी मागणी सकल हिंदू समाज, नळदुर्ग यांच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. या दिवशी हजारो भाविक उपवास करून मंदिरांमध्ये दर्शन घेतात. तसेच शहरात भजन, कीर्तन, दिंड्या व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या दिवसाचे पावित्र्य कायम राहावे आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, यासाठी शहरातील सर्व मटन, चिकन व इतर मांसविक्रीची दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवण्याबाबत आवश्यक आदेश देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शहरातील धार्मिक वातावरण अधिक सुसंवादी राहण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस व न.प. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनावर गणेश मोरडे यांची स्वाक्षरी आहे.सदरील निवेदन पोलिस हवालदार राजेंद्र गायकवाड यांनी स्विकारले आहे.
धार्मिक भावना जपण्यावर भर
आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे धार्मिक वातावरण अबाधित राहावे आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने मांसविक्रीची दुकाने एक दिवस बंद ठेवण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे.