एनसीसी विभागाची यशाची परंपरा कायम; बी व सी प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश
मुरूम, दि. २४ जुलै :
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत बी व सी प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५३ महाराष्ट्र बटालियन, लातूर यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत बी प्रमाणपत्र परीक्षेत २० कॅडेट्स तर सी प्रमाणपत्र परीक्षेत ३ कॅडेट्स यशस्वी झाले.
या यशस्वी कॅडेट्सचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अस्वले यांनी, "एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होते. पोलीस व सैन्यदलात भरती झाल्यानंतर देशसेवेसोबतच समाजसेवेचीही जबाबदारी पार पाडावी. तसेच ग्रामीण भागातील गरीब, पीडित व वंचित विद्यार्थ्यांपर्यंत एनसीसीचे उद्दिष्ट आणि महत्त्व पोहोचवून अधिकाधिक युवकांना या चळवळीत सहभागी करून घ्यावे," असे आवाहन केले.
कार्यक्रमास डॉ. पद्माकर पिटले, कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. राम जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने एनसीसी विभाग, मार्गदर्शक अधिकारी आणि यशस्वी कॅडेट्सचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.