पवनचक्की प्रकल्पातील वीजतारा चोरीचा पर्दाफाश; ४ गुन्हे उघड, दोन आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. २४ :

 धाराशिव जिल्ह्यातील विविध पवनचक्की प्रकल्पांमधून विद्युत वाहिनीच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चार गुन्ह्यांची उकल झाली असून १६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून विद्युत वाहिनीच्या तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.

शुक्रवारी (दि. २४) सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वाशी तालुक्यातील बोरी पाटी पारधी पिढी परिसरातून दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एक महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक अशोक लेलँड दोस्त वाहन जप्त करण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या साथीदारांसह आंबेवाडी, बरमगाव, लोहारा आणि कळदेव निबाळा शिवारातील पवनचक्की प्रकल्पांमधील विद्युत वाहिनीच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे २९९ किलो वजनाच्या विद्युत वाहिनीच्या तारा, तसेच चोरीसाठी वापरलेली दोन वाहने असा एकूण १६.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना बेंबळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण तसेच चालक पोलीस हवालदार रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने पार पाडली.
 
Top