अणदूर गटाच्या विकासाला नवे बळ; सर्व गावांचा विकास आराखडा निश्चित; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे डॉ. जितेंद्र कानडे यांचे निर्देश
अणदूर, दि. २५ जुलै :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद गटातील गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. गावनिहाय विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत गरजा, प्रलंबित प्रश्न आणि प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांवर यावेळी सखोल चर्चा झाली.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे होते. पंचायत समिती सदस्य रणवीर चव्हाण व अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अणदूर, धनगरवाडी, चिवरी, आरळी खुर्द, बसवंतवाडी, बोराणदीवाडी, देवसिंगा तुळ, वडगाव देव आणि गंधोरा या गावांतील विकासकामांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन आवश्यक कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. कानडे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशी सूचना केली. मंजूर विकासकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे तातडीने निराकरण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील, गंधोराचे उपसरपंच संजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य डॉ. विवेक बिराजदार, अप्पा गायकवाड, बालाजी शिंदे, सचिन शिंदे, , सरपंच मुकेश सगट, धनगरवाडीचे सरपंच नागनाथ घोडके, उपसरपंच राम कदम, अनिकेत घोडके यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समिती सचिव म्हणून विस्तार अधिकारी श्रीमती नाईक, विस्तार अधिकारी तीर्थकर, विस्तार अधिकारी नडगिरे तसेच ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे यांनी बैठकीचे नियोजन केले. कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालविकास, समाजकल्याण, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारीही बैठकीस उपस्थित होते.