'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने नळदुर्ग दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात
नळदुर्ग, दि. २६ जुलै :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नळदुर्ग शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ व शिवशाही तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातून पारंपरिक व भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या निनादात, भजन-कीर्तनाच्या सुरावटीत आणि "'ज्ञानोबा-तुकाराम''च्या अखंड जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहरात भक्तीची अनोखी अनुभूती दिली.
मराठा गल्ली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत पुष्पवृष्टी केली, तर महिला-पुरुषांनी फुगड्या खेळत आणि हरिनामाचा गजर करत भक्तिरसाचा आनंद लुटला.
मिरवणुकीतील आणखी एक आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेली चिमुकली बालके. त्यांच्या निरागस आणि पारंपरिक वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
भवानी चौकात नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह शाखेच्या वतीने वारकरी व भाविकांना केळी तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सेवाभाव जपण्यात आला.त्याचबरोबर दिंडी गेल्यानंतर रुपामाताच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावरील स्वच्छता केली.
मिरवणुकीनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. वारकरी आणि भाविकांसाठी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली. या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, शिवशाही तरुण मंडळ तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा पालखी सोहळा नळदुर्गकरांसाठी संस्मरणीय ठरला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सकल हिंदू समाजाच्या आवाहनानुसार मांस मच्छी विक्री करणा-या व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद पाळले.