कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा आता नळदुर्गकडे वळणार का?
नळदुर्ग,दि.२६ जुलै
पेपरफुटीच्या प्रकरणात दिल्ली हादरवून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याइतकी ताकद दाखवणारी 'कॉक्रोच जनता पार्टी' आता नळदुर्गच्या दिशेने दुर्बीण फिरवणार का, असा प्रश्न शहरभर चौका चौकात चर्चेचा विषय ठरला आहे.
नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नागरिकांच्या मते अनेक प्रश्न अजूनही धूळ खात पडले आहेत. नागरी सुविधांचा बोजवारा, कथित आर्थिक अनियमितता, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आणि त्यावर प्रशासनाची शांत भूमिका. यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध सुटू लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी २९ जुलै रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
आता शहरात मिश्कील चर्चा सुरू आहे...
"दिल्लीत पेपरफुटीचा वास लागला आणि कारवाई झाली... नळदुर्गच्या नगरपालिकेतील कथित घोटाळ्यांचा वास अजून कोणाच्या नाकापर्यंत पोहोचलेलाच नाही का?"
नागरिकांचेही म्हणणे तितकेच बोलके आहे...
"कॉक्रोच शोधण्याची मोहीम देशभर सुरू आहे; पण नळदुर्गच्या फायलींमध्ये लपलेले 'कॉक्रोच' बाहेर काढण्यासाठीही एखादे स्प्रे मशीन येणार का?"
आता २९ जुलैच्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या आंदोलनानंतर चौकशीची फाईल पुढे सरकते की पुन्हा एखाद्या कपाटात 'विश्रांती' घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!